संघर्षची सुरुवात

साल होते १९८१ आम्ही कबड्डी खेळणारे डीबीजे महाविद्यालयातील खेळाडू, चिपळूण मधील गोकुळाष्टमीनिमित्त होणाऱ्या प्रतिष्ठेच्या कोहिनूर मित्र मंडळाच्या स्पर्धांसाठी महाविद्यालयाचा संघ उतरवू इच्छित होतो. तेव्हा आम्ही भाऊ काटदरे, नयन साडविलकर, भाऊ पवार, मुन्ना कदम, बंधू कदम, बावा सावंत-देसाई, राजा चव्हाण, शिऱ्या सावंत, कमू बेंडके, तात्या आवले, मिलिंद चौधरी, प्रदीप पवार, किरण जागुस्टे इत्यादी तरुण खेळाडू महाविद्यालयात होतो (बेचाळीस वर्षांनी खेळाडूंची नावे लिहित आहोत त्यामुळे कोणाचे नाव राहिले असण्याची शक्यता आहे त्या बद्दल माफ करावे पण नक्की निदर्शनास आणावे म्हणजे सुधारणा करता येईल). त्यासाठी आम्ही आमच्या क्रीडा प्राध्यापकांकडे परवानगी मागवली त्यांनी प्राचार्यांकडे परवानगी मागितली असता, आता परीक्षा आहे त्यामुळे नको असे उत्तर आले. आमचा संघ दर्जेदार होता व आम्हाला खेळायचेच होते. आम्ही प्राचार्यांना भेटायचे ठरवले. एक दिवस आम्ही सात-आठ जण व्हरांड्यातून तावातावाने प्राचार्यांकडे निघालो. आमचे बोलणे चाललेले असताना… अशा प्रकारच्या अन्यायाविरुध्द आपण संघर्ष करायचा असं मुन्ना म्हणाला. आम्ही प्राचार्यांकडे गेलो. चांगल्या अभ्यासाच्या हमीवर त्यांनी खेळायला परवानगी दिली. आम्ही उत्तम खेळून महाविद्यालयाला अजिंक्यपद मिळवून दिले आणि तो विषय तिथेच थांबला पण संघर्ष आमच्या मनात रुजलं होतं.

१९८२ साली आम्ही बरेचसे खेळाडू शेवटचे वर्ष संपले म्हणून महाविद्यालया बाहेर पडलो. कबड्डी मध्ये चांगले नाव मिळवत होतो परंतु कोणत्याही स्थानिक संघाकडून खेळत नव्हतो. आपल्या सर्व खेळाडूंचा एक नवीन संघ करुया असे विचार चालू होते. यात भाऊ काटदरे यांनी पुढाकार घेतला,  इतर सर्व खेळाडूंची त्यांना साथ होतीच. काही दिवस नवीन संघ करू या का? काय करता येईल? काय नाव ठेवायचं? इत्यादीवर भरपूर चर्चा झाली.  शेवटी १८ जुलै १९८२ रोजी सायंकाळी पाच वाजता चिपळूण मधील मध्यवर्ती आंबेडकर सभागृह येथे सभा घेण्यात आली. सभेला पंधरा/ वीस जण उपस्थित होतो. भाऊ काटदरे यांनी तेथे छोटेसे भाषण दिले व नवीन संघाची गरज सांगितली व संघर्ष हेच नाव ठेवूया आणि संघ स्थापन करूया असे सांगितले. सर्वांनी त्यांना अनुमोदन दिले अशा पद्धतीने संघर्ष क्रीडा मंडळाची स्थापना झाली.

त्याकाळी चिपळूणचे प्रसिद्ध फोटोग्राफर मनोहर शेठ यांना कबड्डीमध्ये रस होता. ते आमच्या खेळाचे नेहमीच कौतुक करत असत. त्यांनाच आम्ही विनंती करून अध्यक्ष स्थानी नेमले. त्यानी त्या वेळी संघर्ष म्हणजे काही भानगड, मारामारी नाहीना? असे गमतीत विचारलेले आठवते.

आम्ही महाविद्यालयाच्या टीम मधून खेळत असताना महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करत असायचो. आता महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते मैदान आम्हाला उपलब्ध नव्हते. आता काय करायचं हा प्रश्न आला हा प्रश्न सोडवला आमच्या श्री देव जुना कालभैरव मंदिराचे कै. सुरेश शेट्ये यांनी. ते सुद्धा कबड्डीचे शौकीन होते आणि आमचा खेळ त्यांना निश्चित आवडत असे. त्यांनीच आम्हाला सांगितले की देवाच्या मैदानावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर कालभैरव मंदिराच्या बाहेर पटांगणात कबड्डी मैदान आखले आणि कबड्डीचा सराव चालू केला. कबड्डीचा हा सराव अगदी आत्तापर्यंत चालू होता. मंदिराच्या नवीन वास्तूचे बांधकाम चालू झालं तेव्हा सुद्धा तिथेच आम्हाला नवीन घेतलेल्या जागेमध्ये मैदान मिळालं आणि अजूनही आम्ही तिथे प्रॅक्टिस करत आहोत. श्री देव जुना कालभैरवाच्या छत्रछायेत संघर्ष सदैव बहरत आहे.  

आम्ही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो विजय मिळवत गेलो फक्त खेळ एवढेच उद्दिष्ट न ठेवता पंच प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रयत्न केले. कै. चंद्रकांत नार्वेकर या रेल्वेच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांना आणून सातत्याने खेळाडूंना प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आम्ही उत्तम कबड्डी खेळाडू तयार करू शकलो. कबड्डी शिवाय सांस्कृतिक स्पर्धा, जलतरण स्पर्धा, जाकडीनृत्त्य स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान इत्यादी विविध विषयात सातत्याने काम करत आहोत.


संस्थेबद्दल

संघर्ष क्रीडा मंडळ ही कोकणातली एक आघाडीची कबड्डी क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. १८ जुलै १९८२ रोजी स्थापन झालेली ही संस्था सातत्याने कबड्डी क्षेत्रात नवनवीन गोष्टी करीत आली आहे. सुरुवातीपासून आपल्या शिस्तीसाठी हा संघ प्रसिद्ध आहे. श्रम, धैर्य, निष्ठा हे ध्येय समोर ठेवून डीबीजे महाविद्यालयामध्ये १९८१ साली कबड्डी खेळणारे युवक भाऊ काटदरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी ही संस्था स्थापन केली. सुरुवातीच्या काळात छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नंतर जिल्ह्यामध्ये एक आघाडीचा संघ म्हणून नाव मिळवले. १९८२ साल पासून चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या ७५% स्पर्धे मध्ये अंतिम विजेतेपद संघर्ष क्रीडा मंडळ असे.

खेळामध्ये पाय घट्ट रोवल्यानंतर हळूहळू त्यांनी त्यांनी पंच म्हणून कामगिरी करायला सुरुवात केली. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील पंच परीक्षा पास होऊन पंच म्हणून उत्तम कामगिरी करू लागले. आपला खेळ अधिक उत्तम व्हावा यासाठी कै. चंद्रकांत नार्वेकर या रेल्वेच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक यांना संस्थेसाठी प्रशिक्षक म्हणून आणले. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रम मुळे संघात उत्तम उत्तम खेळाडू तयार झाले.

संघर्ष क्रीडा मंडळ कबड्डीमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर इतर काही गोष्टी कराव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच १५ ऑगस्ट रोजी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. चिपळूण मधील प्रसिद्ध रामतीर्थावर पावसाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात लोकं, युवक, मुलं पोहायला येत असत. अनेक जण याच ठिकाणी पोहायला शिकलेले आहेत. चिपळूण मध्ये पूर्वी जलतरण स्पर्धा होत नसत. संघर्षचे भाऊ काटदरे हे पोहोण्या मध्ये प्रसिद्ध होते. चर्चेतून निराळे काहीतरी करूया म्हणत सर्वांनी जलतरण स्पर्धा घेण्याचे ठरवले. रामतीर्थ येथे स्पर्धा घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठली सोय नव्हती. रामेश्वर मंदिर अर्धे पडलेले होते म्हणून आम्ही त्या ठिकाणी शेड बांधून त्यामध्ये रात्रभर थांबून भुता खेताच्या गोष्टी गप्पा मारत रात्र जायचे आणि सकाळी स्पर्धा व्हायच्या. या स्पर्धेमध्ये चिपळूण मधील खेळाडूंना जलतरण क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण झाली. पुढे या स्पर्धा १५ ऑगस्ट शासकीय कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट झाल्या होत्या.

 पुढे चिपळूण नगरपरिषदेचा जलतरण तलाव चालवायला घेतल्यानंतर ही स्पर्धा उत्तम प्रकारे  करण्यात आली. मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये खंड पडले परंतु सातत्याने ही स्पर्धा चालू ठेवण्याचा  संघर्ष क्रीडा मंडळाचा प्रयत्न आहे. चार वर्षे जलतरण तलाव संघर्ष क्रीडा मंडळाने चालवला त्यावेळी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू पदके मिळवायला लागले होते.

संघर्ष

आता परीक्षा आहे त्यामुळे खेळ नको असे उत्तर आले…
…अशा प्रकारच्या अन्यायाविरुध्द आपण संघर्ष करायचा असं मुन्ना म्हणाला. आम्ही प्राचार्यांकडे गेलो. चांगल्या अभ्यासाच्या हमीवर त्यांनी खेळायला परवानगी दिली. आम्ही उत्तम खेळून महाविद्यालयाला अजिंक्यपद मिळवून दिले. आता संघर्ष आमच्या मनामध्ये रुजले होते.

संघ

आम्ही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गेलो विजय मिळवत गेलो

पंच आणि प्रशिक्षक

फक्त खेळ एवढेच उद्दिष्ट न ठेवता पंच – प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रयत्न केले. कै. चंद्रकांत नार्वेकर या रेल्वेच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांना आणून सातत्याने खेळाडूंना प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आम्ही उत्तम कबड्डी खेळाडू तयार करू शकलो.

Scroll to Top