वृक्षारोपण
वृक्ष लागवड आणि संगोपन हे आजकाल पर्यावरणाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा झालेला आहे. आम्ही क्रीडा क्षेत्रात असल्याने कायम कबड्डी स्पर्धा खेळत आलो. खूप स्पर्धांमध्ये भर दुपारी बारा, एक वाजता खेळत असायचो त्या उन्हामध्ये खेळणं अत्यंत कठीण असायचं कारण मैदान पूर्णपणे तापलेले असायचे. तापलेल्या मैदानात खेळत असताना लक्षात यायचे नाही पण आउट झाल्यावर पाय प्रचंड भाजेलेले जाणवायचे. मग पायावर पाणी ओतून घ्यायचं पण त्यामुळे पायाला फोड यायचे. परुंतु काही वेळा मैदानावर मोठ्या झाडांची सावली असली की थंडावा असायचा. या सगळ्यामुळे पर्यावरण आणि त्यातील वृक्षांचे महत्त्व हे आम्हाला चांगलंच माहिती होतं व त्याच मुळे आम्ही त्या काळात सुद्धा वृक्षारोपण करत आलो आहोत. प्रतिवर्षी आम्ही आमच्या मैदान जवळ किंवा चिपळूण मध्ये आसपास काही वृक्ष लागवड करीत होतो.
यावर्षी सुद्धा आम्ही होळीच्या माळावरती 25 वृक्ष देशी लावले आहेत आणि ते संपूर्णपणे जगवायची जबाबदारी आमच्या खेळाडूंनी घेतलेली आहे. फक्त क्रीडाक्षेत्र एवढेच न पहाता आपण पर्यावरणामध्ये सुद्धा काहीतरी समाजाचे, देशाचे देणे लागतो तसेच आपल्याला जगण्यासाठी पर्यावरण उत्तम असणे गरजेचे हे जाणून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.