जलतरण स्पर्धा

चिपळूण मधील एका मान्यताप्राप्त क्रीडा संस्थेने जलतरण स्पर्धा
घेतल्या. या स्पर्धा अर्थातच चिपळूणच्या प्रसिद्ध रामतीर्थ तलावामध्ये
१५ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या. स्पर्धा झाली, त्यातले विजेतेही
जाहीर करण्यात आले. बक्षीस समारंभ मात्र नंतर करण्यात येईल असे
सांगण्यात आले. एक महिन्यानंतर कुठल्यातरी कार्यक्रमात हा बक्षीस
समारंभ झाला व विजेत्यांना पाच रुपये पाकिटात घालून देण्यात आले.
ही रक्कम म्हणजे अगदीच मामुली होती आणि या सगळ्या
प्रकारामुळे खेळाडूंची एक प्रकारे चेष्टाच केली गेली, त्यांचा कुठलाही
मान राखला गेला नाही किंवा खेळाची कदर केली नाही असं सर्वांना
वाटत होतं.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता भाऊ काटदरे यांनी. त्यांनी याबाबत अनेक मान्यवरांजवळ चर्चा केली, वृत्तपत्रांमध्ये लिहून सुद्धा दिलं. स्पर्धा अशा पद्धतीने व्हायला नकोत तर खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल असे आयोजन असावे. बरेच दिवस यावर चर्चा होत होती. आमचे खेळाडू सुद्धा या संदर्भात बोलत होते आणि बोलता बोलता विषय निघाला एवढं कशाला पाहिजे आपण स्पर्धा घेऊया. दाखवून देऊ कशा प्रकारची स्पर्धा असावी. यातूनच १५ ऑगस्ट रोजी स्पर्धा घ्यायचे नक्की झाले. स्पर्धा रामतीर्थ येथेच होणार हे नक्की होते. पण रामतीर्थावरती चांगल्या पायऱ्या होत्या, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असायचं परंतु तिथे असलेले मंदिर हे पडीक झालं होतं. अर्ध मंदिर पडलं होतं आणि तिथे खूप पाणी, चिखल, काटे, गवत असत. पहिल्या वर्षी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. सगळ साफ केलं, संध्याकाळ झाली होती तरी संध्याकाळच्या वेळी आम्ही तिथे ताडपत्री आणून एक छप्पर बनवल. बरच सामान आणलं होतं आणि हे सगळं आता तिथेच कसे ठेवायचे कारण रात्री चोरी होईल. म्हणून मग आम्ही तिथेच रात्री मुक्काम केला. रात्र गप्पा गोष्टीत जागून काढली. शेजारीच स्मशान होते. भूता खेताच्या गोष्टी
सांगितल्या. सकाळी उत्कृष्ट प्रकारे स्पर्धा आयोजन केलं. विजेत्यांना चांगली बक्षिसे लगेच दिली. उत्तम प्रकारची जलतरण स्पर्धा कशी असते याचे उदाहरण आम्ही सर्वांना दाखवून दिले. ही स्पर्धा दरवर्षी घेण्याचा आमचा कुठलाही मानस नव्हता परंतु एकंदर सर्वांनी केलेले कौतुक त्याला झालेली गर्दी हे सगळे पाहिल्यावर आम्हालाही उत्साह आला आणि प्रतिवर्षी स्पर्धा घ्यायच्या असे आम्ही ठरवलं. त्यानंतर एक दोन वर्ष सातत्याने स्पर्धा घेतल्यानंतर प्रचंड गर्दी व्हायला लागली आणि स्पर्धक पण यायला लागले. स्पर्धा नावारूपाला आली. १५
ऑगस्टचे झेंडावंदन झाल्यानंतर सगळे लोक या स्पर्धांसाठी येत असत. खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होत असे स्पर्धक सुद्धा भरपूर येत. त्यांना उत्तम प्रकारे बक्षीस दिली जात. यामुळे या स्पर्धा एवढ्या प्रसिद्ध झाल्या की शासकीय कार्यक्रमात सुद्धा त्याची नोंद होऊ लागली. अनेक वर्षे या स्पर्धा घेत होतो. नंतर जलतरण तलाव झाला आणि या स्पर्धा
थोड्या काळासाठी थांबल्या. परत जलतरण तलाव चालू झाल्यानंतर अधिक उत्साहात ह्या स्पर्धा चालू झाल्या. त्याही पेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे जलतरण कोच आणून आम्ही प्रशिक्षणाला सुद्धा सुरुवात केली. सुमारे २२ ते ३० विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे खेळाडू राज्य पातळीवर स्पर्धांमध्ये पदके मिळवू लागले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top